• शुक्र. मार्च 29th, 2024

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा धोका – डॉ. तात्याराव लहाने

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका आणखी वाढणार. लहान मुलांची अधिक काळजी घेण्याची गरज.

दीपक भातुसे, मुंबई : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरु असताना आता कोरोनाची तिसरी लाट ही अधित घातक असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेचा लहान मुलांना देखील धोका असल्याचा वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी म्हटलं आहे. झी24तास सोबत बोलतांना त्यांनी ही माहिती दिली. ‘ऑक्टोबरनंतर तिसरी लाट येईल अशी शक्यता आहे. तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन महत्त्वाचे आहे. त्यामुळे राज्य सरकारने मिशन ऑक्सिजन मोहीम सुरू केली आहे. रुग्णालये स्वतः ऑक्सिजन कसा उपलब्ध करतील किंवा त्यांना तो कसा उपलब्ध करून देता येईल याची तयारी सुरू आहे. बेडची संख्या आपण ४.५ लाखपर्यंत वाढवली आहे. १८ वर्षापर्यंत आपण लस देत आहोत. ‘

‘तिसऱ्या लाटेत १० वर्ष वयापर्यंतच्या मुलांना कोरोना होऊ शकतो. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्स स्थापन केली आहे. टास्क फोर्सने दिलेल्या सूचनेनुसार काम केलं जातंय. लहान मुलांना लागणारा व्हेंटीलेटर, आयसीयू, औषधे उपलब्ध केली जाणार आहेत. ५० बेडच्या वरील रुग्णालायांना त्यांनी स्वतः ऑक्सिजन निर्माण करावा असं सांगणार आहोत.’ ‘महाराष्ट्रात कोणतीही गोष्ट लपवली जात नाही. लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यात संख्या वाढत होती, त्यानंतर संख्या स्थिरावली आहे. टेस्ट कमी करतो असं नाही. रुग्ण पॉझिटीव्ह येण्याचं आपलं प्रमाण सरासरी ४० टक्के होते आता ते २० टक्क्यावर आलं आहे. आपण टेस्ट करतोय, पॉझिटीव्हचं प्रमाण कमी झालंय.’

‘१५ मे पर्यंत रुग्णवाढीचा आकडा ५० ते ६० हजारच्या घरात राहिल. मे च्या शेवटच्या आठवड्यात रुग्ण वाढीचा आकडा 50 हजारच्या खाली जायला सुरुवात होईल. तिसऱ्या लाटेची आपण तयारी केल्याने तेव्हा लॉकडाऊन लावण्याची गरज पडणार नाही. नागरीकांनी त्रिसुत्री पाळली (हात धुणे, अंतर राखणे, मास्क वापरणे) तर काहीच न करता आपण तिसऱ्या लाटेचा सामना करू शकतो.’

आज लस कमी उपलब्ध होत आहे. निर्मिती वाढली तर लस उपलब्ध होईल. लस उपलब्ध होऊन ऑगस्ट ते सप्टेंबरपर्यंत बऱ्यापैकी लसीकरण होईल.