• गुरू. एप्रिल 25th, 2024

Diabetes, TB रुग्णांसाठी मोठी बातमी; तब्बल 34 औषधांचे दर होणार कमी

Byनिस्सीम काणेकर

सप्टेंबर 13, 2022

Essential Medicines : देशात अत्यावश्यक औषधे स्वस्त होणार आहेत. आपल्याला लागणाऱ्या अत्यावश्यक औषधांची यादी (National List of Essential Medicines) प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये मधुमेहविरोधी औषध इन्सुलिन ग्लेर्जिन, अँटी-टीबी ड्रग डेलामॅनिड, आयव्हरमेक्टिन आणि अँटीपॅरासाइट या औषधांचा समावेश आहे. NLEMच्या यादीमध्ये 384 औषधांचा समावेश करण्यात आला आहे. यादीत 34 औषधांचा समावेश करण्यात आला असून 26 औषधे काढून टाकण्यात आली आहेत.

NLEM मध्ये सूचीबद्ध असलेली औषधे नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी (NPPA) ने ठरलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये विकली जातात. प्रथमच NLEM 1996 मध्ये तयार करण्यात आले. यापूर्वी 2003, 2011 आणि 2015 मध्ये त्यात बदल करण्यात आला आहे. आता ही यादी सप्टेंबर 2022 मध्ये पाचव्यांदा बदलली गेली आहे.

या यादीत Nicotine Replacement Therapyचाही समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सिगारेटं व्यसन सोडणाऱ्या औषधांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यासोबतच Ivermectin हीचाही यादीमध्ये समावेश आहे. या औषधाचा कीटक मारण्यासाठी उपयोग होतो. हे औषध कोरोनामध्ये प्रभावी ठरलं होतं.

यादीमध्ये समावेश नसलेल्या औषधांच्या कंपन्या दर वर्षी 10 टक्क्यांपर्यंत किंमत वाढवू शकतात. अंदाजे 1.6 लाख कोटी रुपयांच्या देशांतर्गत फार्मा मार्केटमध्ये शेड्यूल्ड औषधांचा वाटा अंदाजे 17-18 टक्के आहे. सुमारे 376 औषधांची किंमत नियंत्रणात आहे.

किंमत मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांना शिक्षा केली जाते. यंदा परवडणाऱ्या किमतीत पुरेशा प्रमाणात मिळणाऱ्या औषधांची यादी तयार करण्यास स्थायी समितीला सांगण्यात आलं.

यंदा किंमत वेगळ्या पद्धतीने ठरवण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाने यादीत समाविष्ट असलेल्या औषधांची यादी जाहीर केली. त्याच वेळी, रसायन आणि खते मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या फार्मा विभागाने त्यांचा औषध किंमत नियंत्रण आदेशात समावेश केला. NPPA नंतर किंमत निश्चित करते.