• बुध. मे 29th, 2024

IPL 2021 च्या उर्वरित सामन्यांसाठी चाहत्यांना स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार का? – snewslive.com

आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये (IPL in UAE) करण्यात आले आहे.

मुंबई : आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये (IPL in UAE) करण्यात आले आहे. यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. त्यात आता चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. चाहत्यांना स्टेडियममध्ये जावून या 31 सामन्यांचा आनंद लुटता येणार आहे. थोडक्यात म्हणायचं झालं तर, क्रिकेटप्रेमींना स्टे़डियममध्ये परवानगी असणार आहे. क्रिकबझनुसार, यूएई क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने काही अटी शर्थींनुसार चाहत्यांना स्टेडियममध्ये परवानगी मिळणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र याबाबत अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

अटी काय आहेत?
यूएई क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के चाहत्यांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानुसार, कोरोना लसीकरण झालेल्या चाहत्यांनाच स्टेडियममध्ये प्रवेश मिळणार आहे”. मात्र, या अटीनंतरही स्टेडियममध्ये मोठ्या प्रमाणात चाहत्यांची गर्दी होण्याची शक्यता आहे. कारण यूएईमध्ये मोठ्या प्रमाणात अनेक नागरिकाचं लसीकरण झालं आहे.

बीसीसीआयचे अधिकारी यूएईत
आयपीएलच्या 14 व्या मोसमातील दुसऱ्या टप्प्याच्या आयोजनासाठी बीसीसीआयचे काही अधिकारी हे यूएईसाठी रवाना झाले आहेत. बीसीसीआयचे हे अधिकारी यूएई क्रिकेट बोर्डासोबत चर्चा करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूएईतून भारतात ये-जा करण्यावर निर्बंध आहेत. त्यामुळे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना यूएईला जाण्यासाठी विशेष परवानगी घ्यावी लागली होती.