• शुक्र. जून 21st, 2024

Mumbai Local Mega Block : मध्य मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक; हार्बर, पश्चिम मार्गावरील प्रवाशांना दिलासा

Byनिस्सीम काणेकर

एप्रिल 15, 2023

Mumbai Local : मुंबईची (Mumbai News) लाईफलाईन असणाऱ्या लोकल रेल्वेच्या (Local Train) देखभालीच्या कामासाठी दर रविवारी मुंबईत तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (mega block) घेण्यात येत असतो. मात्र या रविवारी हार्बर रेल्वे (harbour line) मार्गावर मेगाब्लॉक नसणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारी (appasaheb dharmadhikari) यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी नवी मुंबई येथे होणाऱ्या पुरस्कार प्रदान सोहळ्यात सहभागी होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोई टाळण्यासाठी यंदाच्या रविवारी हार्बर रेल्वे मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. मात्र मध्य मार्गावर अभियांत्रिकी कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मनसेचे आमदार राजू पाटील, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासह मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रेल्वे प्रशासनाला हार्बर रेल्वे मार्गावरील रविवारचा मेगाब्लॉक रद्द करण्याचं आवाहन केलं होतं. मध्य रेल्वेने ही मागणी मान्य केली आहे. त्यामुळे आता हार्बर रेल्वे मार्गावरील प्रवाशांना रविवारी हार्बर रेल्वेने प्रवास करता येणार आहे. रविवारी 16 एप्रिल रोजी डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याहस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी नवी मुंबईच्या खारघर येथे लाखोंच्या संख्येने अनुयायी येणार आहेत. त्यामुळे रविवारी हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

दरम्यान, मध्य मार्गावर रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा यांची देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकवेळी माटुंगा आणि मुलुंड दरम्यानची जलद मार्गावरील लोकलसेवा धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. परिणामी सीएसएमटीहून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ठाण्याच्या पुढे या जलद लोकल डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. ठाणे येथून सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 वाजेपर्यंत अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. माटुंग्यानंतर या लोकल अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील.