• रवि. जुलै 14th, 2024

कोलकाता:ट्रामच्या संवर्धनाची लोकांची मागणी! कोलकातामध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे ट्राम सेवेवर दबाव

Byनिस्सीम काणेकर

सप्टेंबर 6, 2021

सिटी ऑफ जॉय अर्थात कोलकाताची लाइफलाइन ट्राम सेवा आता काहीशी मागे पडू लागली आहे.

१४० वर्षांची परंपरा असलेली ट्राम नागरिकांना कार्यालये, रेल्वे स्थानकासह इतर ठिकाणी सहजपणे पोहोचवते. इंग्रजांच्या काळातील या साधनाला कोलकाताचे किंवा बाहेरून आलेले लोक आनंददायी प्रवासासाठी वापरू लागले आहेत. कोलकाताची ही संपत्ती असल्याचे त्यांना वाटते. हा वारसा जपण्याचा आणि त्याचे संवर्धन करण्यात यावे, असे सामान्य नागरिकांना वाटते. अनेक लोकांना तर ट्राम जणू परीकथेसारखी भासू लागते.

कोलकातामधील ट्राम ही आशियातील पहिली ट्राम सेवा आहे. १८८१ मध्ये बनलेल्या ट्राम प्रणालीने कोलकाताला महानगराच्या स्वरूपात विकसित करण्यासाठी मोठी भूमिका निभावली. देशात आतापर्यंत सुरू असलेली एकमेव सेवा आता संकटात सापडली आहे. त्यामागे नैसर्गिक आपत्ती तसेच प्रशासकीय बेजबाबदारपणा कारणीभूत ठरला. त्यातून ट्राम सेवा मागे पडली. आता ही सेवा जुन्या आठवणींचा वारसा असे रूप घेत आहे. शहरातील सर्वात सोपे साधन असूनही नियमित प्रवाशांची संख्या घटत चालली आहे. वास्तविक बस व मेट्रो रेल्वेसोबत ट्राम शहरातील वाहतुकीच्या साधनांमधील मिश्रित भाग असला पाहिजे. कारण ट्राममुळे दीड कोटी लोकसंख्येच्या शहरातील लोकांचे जीवन २१ व्या शतकात सुकर होते.

ट्राम समर्थक म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात डिझेल-पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या, कार, प्रदूषण पसरवू लागल्या आहेत. ट्राम आेव्हरहेड इलेक्ट्रिक लाइनने चालते. त्या अर्थाने हा इको फ्रेंडली पर्याय आहे. वैज्ञानिक, आर्थिक, पर्यावरणीयदृष्ट्या ट्रामला अग्रस्थान देण्यासाठी हटवता कामा नये, असे पर्यावरणप्रेमींना वाटते.